Monday 18 April 2016

स्त्री शिक्षणाचे प्रणेते : महर्षी धोंडो केशव कर्वे

दगड्या', 'धोंड्या', 'काळ्या' असले एकादे खत्रुड नाव मुलाला ठेवले तर काळसुध्दा त्याच्याकडे ढुंकून पाहणार नाही आणि त्यामुळे त्याला दीर्घायुष्य मिळेल अशी एक अजब समजूत पूर्वीच्या काळी प्रचलित होती. लहान मुलांनी नमस्कार केल्यानंतर त्यांना "शतायुषी भव" असा घसघशीत आशीर्वाद दिला जात असे. या दोन्ही समजुतींची प्रचीती एका महापुरुषाच्या बाबतीत आली. मात्र त्याचे नाव विचित्र असूनसुध्दा त्याने आपल्या कर्तृत्वाने सर्व जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. शंभरावर वर्षे मिळालेल्या आयुष्यात त्यांना उदंड कीर्ती आणि मानसन्मान मिळालेच, पण त्यांनी सुरू केलेले महान कार्य त्यांच्या निर्वाणानंतर सुध्दा जोमाने चालत राहून त्याचा खूप विस्तार झाला आणि त्यातून त्यांचे नाव पुढील शतकानुशतके शिल्लक राहील यात शंका नाही. या महापुरुषाचे नाव आहे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे.

पण हे यश त्यांना सहजासहजी मिळाले नाही. ते मिळण्याच्या आधी त्यांनी अत्यंत खडतर तपश्चर्या केली होती, ती नावलौकिक मिळवण्यासाठी नव्हती, तर समाजातील महत्वाच्या घटकाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी. कोकणातल्या एका लहानशा गावी इसवी सन १८५८ मध्ये धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला. तत्कालीन समजुतीनुसार अदृष्य दुष्ट शक्तींपासून वाचवण्यासाठी त्यांचे नाव 'धोंडो' असे ठेवले होते. पण हा मुलगा अद्वितीय होता. त्या काळामधील भारतीय लोकांना (त्या काळच्या भाषेत 'एतद्देशीय मनुष्यांना') जेवढे ज्ञान प्राप्त होणे पुरेसे आहे असे मेकॉलेसारख्या साहेबांनी ठरवले होते ते त्यांनी स्थानिक शाळेत जाऊन झटपट शिकून घेतले. त्या काळातली शालांत म्हणजे 'व्हर्नाक्युलर फायनल' ही परीक्षा देण्यासाठी कोकणातील मुलांना मुंबईला जावे लागत असे. बालक धोंडो त्यासाठी मुंबईकडे जायला निघाला, पण तिकडे जाणारी बोट चुकली. त्यामुळे निराश न होता धोंडोने घाटावरील क-हाड की सातारा या शहराची वाट धरली. त्या काळात मोटारी नव्हत्या आणि त्यासाठी लागणारे हमरस्तेही बांधले गेले नव्हते. एका खेड्यापासून शेजारच्या खेड्याकडे जाणा-या पायवाटा किंवा फार तर बैलगाडीच्या चाकोरीमधून इतर वाटसरूंच्या सोबतीने शंभरावर मैल दूर चालत चालत, धो धो पावसात आणि हिेस्र वन्य पशूंची भीती न बाळगता मजल दरमजल करीत ते तिसरे दिवशी क-हाड की साता-याला जाऊन पोचले. त्या ठिकाणच्या शिक्षणाधिका-याने धोंडोची किरकोळ शरीरयष्टी आणि चेहे-यावरील निरागस भाव पाहून त्याला 'अजाण बालक' ठरवले आणि वयाच्या अटीवरून फायनलच्या परीक्षेला बसायची अनुमती दिली नाही. निमूटपणे आपल्या गावी परत येऊन धोंडोपंत अभ्यास करत राहिले आणि यथावकाश मुंबईला जाऊन त्यांनी ती परीक्षा दिलीच, त्यानंतर मुंबईमध्ये राहून हायस्कूल आणि कॉलेजचे शिक्षण घेतले. त्या काळात शाळा, कॉलेज आणि अभ्यास सांभाळून त्यातून वेळ काढून शिकवण्या केल्या आणि त्यातून आपला उदरनिर्वाह केला.

बी.ए. पास झाल्यानंतर मायबाप इंग्रजी सरकारची नोकरी त्यांना सहजपणे मिळू शकली असती, पण त्यांचा कल समाजसेवेकडे होता. त्या काळच्या समाजात रूढी आणि परंपरांच्या नावाने अनेक अनिष्ट प्रथा चालत आल्या होत्या. लहानपणीच मुलांची लग्ने लावून दिली जात होती, धोंडोपंतांचासुध्दा बालविवाह झाला होता. अपमृत्यूंचे प्रमाणही मोठे असल्यामुळे काही दुर्दैवी मुली अज्ञवयातच बालविधवा होऊन जात. त्यांचे केशवपन करून त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात असे. उंच माझा झोका ही अलीकडे लोकप्रिय झालेली मालिका आणि काकस्पर्श हा उत्कृष्ट सिनेमा यातून त्या काळातील जीवनाचे थोडे दर्शन घडते. काही समाज सुधारकांनी या रूढींविरुध्द आवाज उठवायला सुरुवात केली होती, पण त्यांची चळवळ लेख, भाषणे, अर्ज विनंत्या या मार्गाने चालली होती. धोंडोपंतांनी प्रत्यक्ष कृतीमधून समाजकार्यात उतरायचे ठरवले.
ते पुण्याला आले आणि लोकमान्य टिळक व आगरकर यांनी सुरू केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजात गणिताचे प्राध्यापक झाले. आपल्याला मिळणा-या वेतनाचा एक भाग फक्त समाजकार्यासाठी बाजूला काढून ठेवायचा आणि वैयक्तिक आयुष्यात कुठलीही अडचण आली, कसलीही गरज पडली तरी त्या पैशांना स्पर्श करायचा नाही असे त्यांनी ठरवले आणि हे व्रत कसोशीने पाळले. या स्वतःच्या मिळकतीतून शिल्लक टाकलेल्या निधीत भर टाकण्यासाठी त्यांनी इतर उदार लोकांना आवाहन केले आणि त्यातून जमलेल्या निधीचा फक्त समाजकार्यासाठीच विनियोग केला. सदाशिव पेठेमधील राहत्या जागेत बालविधवांना आश्रय देऊन त्यांनी या कार्याची सुरुवात केली. त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवणे हा त्यांचा उद्देश होता. पण तत्कालीन समाजाला तो अजीबात मान्य नव्हता. कर्वे कुटुंब आणि त्या आश्रित महिलांना त्यांनी वाळीत टाकले, त्यांना सन्मानाने जिणे अशक्य केले.
कर्व्यांच्या एका सुधारक मित्राने यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना शहराबाहेर हिंगणे इथे त्यांना जमीन देऊ केली. त्यावर एक पर्णकुटी बांधून त्यात कर्व्यांनी त्या पीडित महिलांसाठी आश्रम सुरू केला. त्या आवारातच पुढे मुलींच्या शिक्षणासाठी शाळा, वसतीगृहे वगैरे सुरू करत गेले. १८९६ साली त्यांनी सुरू केलेली स्त्रीशिक्षणसंस्था आजवर कार्यरत आहे आणि तिचा पसारा अनंतपटीने वाढला आहे. या संस्थेच्या साठ शाखा असून त्यात २५००० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. पूर्वप्राथमिक पातळीपासून स्नातकोत्तर (पोस्ट ग्रॅज्युएट) शिक्षणापर्यंत आणि अनेक शाखांमधून ते शिक्षण घेण्याची व्यवस्था या संस्थेकडून केली जाते. त्यात इंजिनियरिंग, आर्किटेक्चर आणि फॅशन डिझाईनसारख्या आधुनिक विषयांमधील शाखांचा समावेश आहे. महर्षी कर्वे यांनीच पुढाकार घेऊन एस.एन.डी.टी. युनिव्हर्सिटी हे भारतातले पहिले खास महिलांचे विश्वविद्यालय सुरू केले होते. कालांतराने ते मुंबईला नेले गेले. त्याच्या शाखासुध्दा अनेक ठिकाणी पसरल्या आहेत.
दुर्दैवाने धोंडोपंताच्या पत्नीचे अकाली निधन झाले. त्या काळच्या प्रथेनुसार त्यांच्या दुस-या विवाहासाठी स्थळे सांगून येऊ लागली होती. पण पुनर्विवाह केला तर तो विधवेशीच करायचा असे त्यांनी पक्के ठरवले होते. त्यांच्या एका मित्राची बहीण बाया अनाथ बालविधवा झाली होती. धोंडोपंतांशी विवाह करून बाया कर्वेंनी त्यांच्या जीवनात प्रवेश केला. कर्वे यांची पत्नी होणे हे सुध्दा अग्निदिव्य होते. ते तर दिवसरात्र आपल्या कार्यात मग्न असत. घर चालवणे आणि मुलांना मोठे करणे सर्वस्वी पत्नीलाच करावे लागत होते. त्यात फक्त समाजाचाच विरोध नव्हता, तर कर्व्यांच्या घरातील मंडळींचासुध्दा होता. लग्न करून ही दंपती जेंव्हा कोकणातल्या मुरुड या त्यांच्या गावी गेली, तेंव्हा नव्या सुनेचे स्वागत तर झाले नाहीच, गावातील सर्वांनी त्यांच्या घराचे दरवाजे त्यांना बंद केले.

धोंडोपंत आयुष्यभर आपल्या तत्वांवर ठामपणे उभे राहिले होते. त्याचे एक उदाहरण असे आहे. त्याच्या विम्याची मुदत संपल्यावर त्याचे जे पैसे त्यांना मिळणार होते ते त्यांनी उदारहस्ते आपल्या शिक्षणसंस्थेला देणार असल्याचे जाहीर केले. त्या वेळी त्यांचा मुलगा कॉलेजला जाण्याच्या वयाचा झाला होता. हे पैसे त्याच्या शिक्षणावर खर्च करावे अशी त्यांच्या पत्नीची इच्छा असणे साहजीक आहे. इतर कोणीही तसेच केले असते. पण कर्व्यांचे म्हणणे असे होते की जर त्यांच्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा या उद्देशाने त्यांनी विमा उतरवला होता. आता ते जीवंत असतांना तशी गरज राहिली नाही, त्यामुळे त्या पैशाचा विनियोग त्यांच्या कार्याकरताच व्हायला हवा. त्याहून त्यांच्या पत्नीला ते पैसे पाहिजेच असतील तर तिने आपला पती निधन पावला आहे असे समजावे, त्यांच्याशी संबंध ठेवू नये आणि तसे जाहीर करावे तरच तिला ते मिळतील.
पत्नी किंवा मुलांबरोबर ते असे कठोरपणे वागत असले तरी समाजावर मात्र त्यांनी कधी राग धरला नाही. समाजाने त्यांचा अनन्वित छळ केला तरी हे लोक अज्ञ आहेत, आपण काय करत आहोत हे त्यांना समजत नाही अशी येशू ख्रिस्तासारखी भूमिका घेऊन त्या समाजाच्या हितासाठीच ते झटत राहिले. संत एकनाथांच्या काळात त्यांनीसुध्दा समानता, विश्वबंधुत्व वगैरेंना धार्मिक समजुतींपेक्षा जास्त वरचे स्थान दिले होते आणि यामुळे तत्कालीन रूढीवादी लोकांचे वैर पत्करले होते. एकदा ते नदीवरून स्नान करून परत येत असतांना कोणी खोडसाळपणे त्यांच्या अंगावर गलिच्छ राड उडवली, त्याच्यावर न रागावता किंवा त्याच्याशी न भांडता एकनाथ महाराज शांतपणे पुन्हा नदीवर जाऊन स्नान करून आले. याची पुनरावृत्ती होत राहिली, पण एकनाथांनी आपला शांतपणा सोडला नाही. अखेर चिखल उडवणाराच कंटाळला. त्याने नाथांची क्षमा मागितली. त्यानर नाथांनी उलट त्याचे आभार मानले आणि तुझ्यामुळे मला आज इतक्या वेळा गोदावरीचे स्नान घडले आणि त्याचे पुण्य लाभले असे सांगितले. महर्षी कर्व्यांची मनोवृत्ती साधारणपणे अशीच होती.

कर्वे यांच्या कामाची महती हळूहळू लोकांना पटत गेली. समाजाची विचारसरणी त्यांना अनुकूल होत गेली. पुराणमतवादी लोकांची पिढी मागे पडून सुशिक्षित आणि उदारमतवादी लोकांची संख्या वाढत गेली. कर्वे यांच्या स्त्रीशिक्षणसंस्थेमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या अनेक महिलांनी स्वतःला या कार्याला वाहून घेतल्या. त्यांनी केलेल्या प्रगतीमधून आणि त्यांच्या सद्वर्तनातून समाजापुढे चांगली उदाहरणे आली. स्त्रियांना शिक्षण दिल्याने त्यांची आणि समाजाची अधोगती होईल या जुन्या खोडांनी दाखवलेल्या भीतीमधील हवा निघून गेली. समाजाने कर्व्यांना साथ द्यायला सुरुवात केली. त्यांच्या सचोटीबद्दल तिळमात्र शंका नसल्यामुळे त्यांना उदारहस्ते देणग्या मिळत गेल्या आणि त्यांनी त्यातली पै न पै त्यांनी सत्कारणी लावली. त्यांची संस्था मोठी होत गेली. अनेक नामवंत त्यांच्या संस्थेला भेट देऊन त्याला सहाय्य देऊन गेले.

अर्थातच त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. भारतामधील सर्वोच्च असा भारतरत्न हा पुरस्कार त्यांना मिळाला. ते महर्षी म्हणवले जाऊ लागले. पूर्वीच्या हिंगणे या गावाच्या परिसरालाच कर्वेनगर असे नाव दिले गेले. पुणे शहराचा विस्तार इतका झपाट्याने झाला की एके काळी ओसाड असलेला हा भाग गजबजून गेला आणि पुणे शहराचा एक महत्वाचा भाग झाला. पूर्वीच्या पुणे शहरापासून हिंगणे या खेड्याकडे जाणा-या रस्त्यालाही कर्वे रोड असे नाव दिले आणि आज हा अत्यंत गजबजलेला हमरस्ता झाला आहे. मुंबईमधील मरीन लाइन्सच्या परिसरातील एक मोठा रस्ता त्यांच्या नावाने ओळखला जातो. पुण्यातील कर्वे रस्त्याच्या कडेला या स्त्रीशिक्षणसंस्थेचे मूळ आणि आजचेही मुख्य स्थान आहे. त्यात अनेक शाळा, कॉलेजे आणि हॉस्टेल्स आहेत. महर्षी कर्वे आणि बाया कर्वे यांची समाधी आहे, तसेच एक स्मारक आहे. कर्वे यांच्या शाळेमधील हजेरीपटापासून ते त्यांना मिळालेल्या भारतरत्न या पदकापर्यंत त्यांच्या जीवनाशी निगडित अशा अनेक वस्तू तेथे मांडून ठेवल्या आहेत. तसेच अनेक छायाचित्रे आणि तैलचित्रांमधून त्याच्या जीवनातील महत्वाच्या घटना दाखवल्या आहेत. प्रत्येक सुजाण नागरिकाने हे संग्रहालय अवश्य पहावे आणि त्यामधून स्फूर्ती घ्यावी.



Sunday 17 April 2016

बिझनेस करताना पुरून पुरून वापरण्याची प्रवृत्ती सोडा. - डी. एस. कुलकर्णी


माझ्या आईने मला दोन गोष्टी सांगितल्या होत्या की, बाबारे आयुष्यात कधी दोन कोट वाल्यांच्या नादी लागू नकोस. एक काळा कोटवाला, म्हणजे वकिलाच्या नादी लागू नका, कोर्टाची पायरी चढू नका आपण धंदेवाले आहोत. डोक्यावर बर्फ व तोंडात खडीसाखर ठेऊन ‘तू बाबा मोठ्या बापाचा, जाणा बाबा’ पण ती कोर्टाची पायरी नको. भाकरी फिरवली नाही तर ती करपते, भाकरी एका जागी कधी ठेवायची नाही. तर दुसरा कोटवाला म्हणजे डॉक्टर, तुमची तब्येत खणखणीत ठेवा, लक्षात घ्या तुम्ही बिझनेस मध्ये आहात. उद्योग बिझनेस मध्ये असलेल्या लोकांनो, अरे आपल्याला आजारी पडायला परवानगी नाही रे. डॉक्टरच्या नादी कधी लागू नका याचा अर्थ तब्येत खणखणीत ठेवा.

बिझनेस करताना पुरून पुरून वापरण्याची प्रवृत्ती सोडा. अंथरून पाहून पाय पसराही ज्या कोणी मराठी माणसाने म्हण तयार केली त्याला आपण माफ् करूया, कशाला त्याच्या नादी लागायचे. अरे व्हा ना मोठे, तुम्हाला कोणी सांगितले तुम्हाला अंथरून पांघरून मिळणार नाही म्हणून.

बाबारे मरताना डोक्यावर ५ रु सुद्धा कर्ज नको, ही दुसरी दळीद्री म्हण कोणी निर्माण केली माहित नाही. कर्ज नाही काढलं तर धंधा चालणार कुठनं. आज मुठभर जोंधळे पेरले तर पोतेभर धान्य येत. पोतेभर जोंधळे पेरले तर किती धान्य येईल हा साधा नियम आहे. आता मला सांगा स्वतःच्या घरातील जोंधळे आणून आणून तुम्ही किती आणणार, तो एक नियम आहे.

आज मी व्याख्यान द्यायला आलो आहे. आज मी इथे दमून आलो नाही, तर चिडून आलो आहे, मी आज खूप चिडलो आहे. मी स्वतः रोज माझ्या बायकोला सांगतो की जर माझे आडनाव कुलकर्णी नसतं आणि मी साला मराठी नसतो तर मी आज अंबानीला मागे टाकलं असतं. आपल्यातील जे मराठीपण आहे ना, मीच किती वेळा बोलतो पण मला सुद्धा अजून पूर्णपणे ओवरटेक करता येत नाही. मी पूर्णपणे मराठी नाही, अर्धा मारवाडी, अर्धा गुजराती व मग उरलासुरला मराठी ब्राम्हण आहे.

मी मारवाडी लोकांचा खूप मोठा भक्त आहे. हिशोबाला ते अगदी पक्के असतात. तोंडात नेहमी खडीसाखर असते. डोक्यावर त्यांच्या नेहमी बर्फ असतो. हे लोक नेहमी फ़्लेझीबल असतात, ताईसाहेब, काकासाहेब असे मधुर बोलतात. या उलट मराठी माणूस ताठ असतो व म्हणतो काय चुकले माझे बोला.

स्वतःच्या लढाया स्वतःच लढायच्या असतात, दुसऱ्यांच्या लढायांचे वर्णन ऐकताना त्याचे काय चुकले तो का पराभूत झाला, तो विजयी कसा झाला हे शोधण्यापेक्षा तो पराभूत झाला तर का पराभूत झाला, त्याच्या चुका कोणत्या हे शोधा आणि त्यातनं त्या इतिहासातून आपण आपल्या लढाया लढायच्या असतात.

आज आपण भारतासारख्या देशात आहोत, एका बाजूने आतिशय भ्रष्ट आचरणाने देश रसातळाला चालला आहे असे असताना त्याच वेळेला आपल्याकडे दुसरी ताकद म्हणजे जगातील सर्वात तरुण लोकसंख्या ही जगात कोठेही नाही ती भारतात आहे. जगातले सर्वात जास्त तरुण आज भारतात आहेत. जगात सर्वाधिक इंग्रजी बोलणारे आपल्या देशात आहेत ह्या काही आपल्या भक्कम बाजू आहेत, त्यामुळे बिझनेस करणाऱ्याला काही मरण नाही.

बिझनेस मध्ये तुम्हाला तुमचा कस्टमर ओळखता आला पाहिजे, तुम्हाला तुमचे आयुष्य ओळखता यायला पाहिजे आणि त्याला अनुसरून बिझनेस करता यायला पाहिजे. नेहमी आपल्या कस्टमरचा अभ्यास करा. मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा कोणताही बिझनेस असू द्या जर तुमचे ऑफिस असेल तर ते नेहमी स्वच्छ क्लीन नीट नेटके ठेवा यावर सुद्धा तुमच्या बिझनेसचे यश अवलंबून असत.

धंद्यामध्ये मार्केटिंग खूप महत्वाचे. धंद्यामधे विकणारा सर्वात महत्वाचा भाग असतो. जर तुम्हाला व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर तर काहीना काही तरी विकायची पहिल्यापासून सवय ठेवा. विनोदाचा भाग सोडून द्या, पण तुम्हाला टकलू माणसाला सुद्धा कंगवा विकता आला पाहिजे. काहीना काही विकण्याचा आत्मविश्वास निर्माण करा मग तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता.

व्यवसायात प्रेझेंटेशन सुद्धा खूप महत्वाचे. सुरवातीच्या काळात मला किर्लोसकरांनी १०० रु दिले होते, चांगले कपडे, बूट व टाय घेण्यासाठी. तेव्हापासून मित्रांनो ही टाय जी माझ्या गळाल्या लागली आहे ती अजूनही आहे. मी नेहमी कुठेही जाताना व्यवस्तिथ नीटनेटके कपडे घालून जातो. तुमचा पेहरावा असा असला पाहिजे की तुम्ही समोरच्याला आपलेसे वाटले पाहिजे. तुमचे व्यक्तिमत्व इतके स्वच्छ पाहिजे की तुमच्या वागण्या बोलण्यातून लोकांना तुमच्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे.

मित्रांनो विहिरीत, ओढ्यात, स्विमिंग पूल / डबक्यात किती दिवस पोहायचे? नदीकडे आपण जायला हवे व पुढे समुद्राचे ध्येय ठेवले पाहिजे. रोज तुम्हाला बिझनेसला पैसे कमी पडत असतील तर समजा तुम्ही प्रगती करत आहात, आणि जर तुमचे पैसे उरत असतील लक्षात ठेवा तुम्ही धोक्याच्या दिशेने जात आहात. दरवर्षी तुमचा १० टक्केने बिझनेस वाढलाच पाहिजे, तुमची ग्रोथ झालीच पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या असाही तसाही तुमचा दरवर्षी बेसिक Infrastructure कॉस्ट वाढणारच आहे मग तुमचा ग्रोथ रेट वाढलाच पाहिजे, आणि यासाठी तुम्हाला कर्ज घेतलेच पाहिजे. तुम्हाला तुमच्या कर्जाचा अभिमान वाटला पाहिजे. मला आज अभिमान आहे की माझ्यावर ७०० कोटींचे कर्ज आहे. या कर्ज देणाऱ्या एकूण १४ बँका आहेत व त्यातील २ अमेरिकन बँक आहेत.

आता ही पत कशी वाढवायची? जर समजा तुमचा एक व्यवसाय आहे व त्यातून तुम्हाला १०० रु मिळाले तर ते सर्व नेउन प्रथम बँकेत भरायचे. आता तुम्हाला तुमच्या व्यवसायचा माल आणण्यासाठी २० रु लागत आहेत, तर ते आता तुमच्या बँकेतील १०० रु मधून २० रु काढा. जेवढे तुमचे बँकेत पैसा जातो तेवढा तो तुमचा टर्नओवर मानला जातो. तुम्ही किती पैसा काढता यापेक्षा किती भरता याला महत्व आहे.

मित्रांनो पेला अर्धा भरला आहे की पूर्ण, हे पाहत बसू नका. तर जे काही आहे, ते देवाने तुम्हाला खूप काही दिले आहे असा विचार करून आयुष्य पुढे न्या. काय गेले आहे त्यापेक्षा काय आले आहे याकडे पहा. माझी ज्यावेळी पेपरची लाईन होती त्यावेळी म्याट्रीकचा निकाल पेपर मधून यायचा. दुपारी जीवाच्या आकांताने ते पेपर आपल्या हातात घ्यायचे व सायकलवर टाकून ‘आला आहे एस.एस. सी. रिझल्ट’ अशी आरोळी मारत ते पेपर विकायचे. १० मिनिटांमध्ये लोक जास्त पैसे देऊन विकत घ्यायचे व व ते पेपर पटकन संपायचे. सगळे अंक १० मिनिटांमध्ये संपून माझ्याकडे एक मोठी चिल्लर जमा व्हायची. ४० रु डाव्या खिशात व ४० रु उजव्या खिशात टाकून मी रुबाबात चालायाचो. ते ८० रु चे जे सुख आहे ते आज ४००० कोटी रु यात मला मिळत नाही. सुख नेमके कशात मानायचे ते मित्रांनो लक्षात घ्या. तुम्हाला समाधान कशात मानायचे हे कळले ना मग पुढे कुठेही त्रास होत नाही.

मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांकडे एक मोठी गोष्ट आहे, एक मोठी ताकद आहे ती म्हणजे विश्वासहर्ता. मराठी माणसाचा विश्वासहर्ता हा मोठा गुण आहे, हाच मोठा आपला ब्रन्ड आहे. लोक इतर काहीही म्हणतील की त्याला धंधा करायला येत नाही, त्याच्याकडे व्यवसायाची समज कमी आहे. हा पण तो मराठी माणूस आहे व तो चोर नाही. अरे हा मराठी माणूस आहे याच्याकडून वस्तू विकत घ्यायला हवी कारण हा कधी फसवणार नाही. मग तुमच्याकडे जर हा इतका मोठा प्लस पॉईन्ट आहे तर तो इनक्याश करा. इथे जरूर गर्वाने बोल की आम्ही मराठी आहोत.
सुरवातीला अनेक छोटे छोटे व्यवसाय करताना मला या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. लहानपणी भाजी विकताना ग्राहक जेव्हा भाजी घ्यायला यायचे तेव्हा माझ्या काकांना सांगायचे की त्या लहान मुलाच्या (म्हणजे माझ्या) हातात तराजू द्या, कारण तो कधीही काटा मारत नाही. तुमच्या तराजूचा काटा हा नेहमी ग्राहकाच्या बाजूनेच झुकलेला असायला हवा.

मी आलेली संधी कधीच सोडत नाही, असे करताना चुका होतात. पण मी त्या दुरुस्त करतो व त्यातून मार्ग काढतो. त्यावेळी पुण्यात जंगली महाराज रोडवर बांधकाम करताना अनेक नियमांमुळे बहुतेक सर्व बांधकाम अनधिकृत होत होते. मग ते महापालिका येउन पडायचे. मग मी जिद्दीने ठरवले की आपण सर्व नियमांत बसवून हॉटेल बांधायचे. मी प्रयत्न केले व सर्व अधिकृत परवानग्या घेऊन बांधकाम केले. त्यात माझे खूप नुकसान झाले, माझी खूप जागा वाया गेली. पण मी म्हटले हरायचे नाही, जिद्द नाही सोडायची. हॉटेल बांधून तयार झाले पण वर्षभर जास्त कस्टमर आलेच नाही. मग मला कमी किमतीत जागा विकण्याचे ऑफर येऊ लागले, काहींनी तर मला वेड्यात काढले. कारण त्यांना लक्षात आले की याच्याकडे कोणीच येत नाही.

मग मी विचार करू लागलो काय करायचे? मग मी स्वतःच रेस्टोरंन्ट चालू करायचे ठरवले. म्हटले डोसा इडली नाही तर मोठे स्वप्न पाहायचे. मग मी सरळ अमेरिके McDonald मध्ये संपर्क केला. त्यांचे अनेक वेळेला नकार आला पण मी सोडलेच नाही शेवटपर्यंत. त्यावेळी मला कोणी तरी तरी सुचवले की तू कार शो रूम चा का विचार करत नाहीस. ज्याने सुचवले त्याचे स्वतःचे कार शो रूम मी पहिले आणि माझे डोळे चकाकले. तिथून उठलो व थेट टोयाटोचे पुण्यातील हेड ऑफिस गाठले आणि टोयाटोची डीलरशीप घेऊन आलो. साहेब वडापाव आणायला गेलो आणि टोयाटो घेऊन आलो. McDonald म्हणजे दोन पावाच्या आत वडा असतो, म्हणजे तो काय वेगळा असतो का? तो वडापावच हो. अशाप्रकारे संधी कुठे लपलेली ते असते सांगता येत नाही.

तुमच्या कस्टमरला तुमचे ऑफिस त्याचे वाटायला हवे. तुमच्या कस्टमरला तुमच्या टेबलावर येउन हात आपटून भांडण्याची मुभा असायला हवी, असे खरच करून बघा तुम्ही आयुष्यात नेहमी यशस्वी आणि यशस्वीच होत जाल. माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा कोणी फोन करतात तेव्हा त्याला गाणे सुद्धा आनंद देणारे असेल याची देखील आम्ही काळजी घेतो. इतक्या बारीक बारीक गोष्टी पहा, तुमच्या कस्टमरला जिंका.

दुसरे मित्रांनो भाषेवाचून काही अडत नाही हे लक्षात घ्या. माझे स्वतःचे इंग्रजी मुळे काहीच अडले नाही. बिझनेस मद्धे जेव्हा तुम्ही पडता तेव्हा भाषेमुळे काहीच अडत नाही. मी खूप देशात फिरतो चीन, जपान, फ्रान्स यासारख्या देशात, तेथील लोकांशी बोलतो भेटतो माझे कशामुळे काहीच अडले नाही. जेव्हा जेव्हा अडचणी येतात ना तेव्हा तेव्हाच मुळात आपल्याला मार्ग सुचतात. तुमच्यात आत्मविश्वास पाहिजे भिडून जाण्याची तयारी पाहिजे. हृदयापासून बोला तीच आपली मातृभाषा असते, त्यावेळी तुमचे डोळे बोलतात, हृदयापासून जे येते तेच कनेक्ट होते. तरुणांनो मला सांगा प्रथम पोरगी पटवताना तुम्ही डोळे मारूनच तुमच्या भावना तिला सांगता ना? तिथे सुद्धा जे हृदयातून येते तेच कनेक्ट होते. डोळ्याच्या भावना, प्रेमाच्या भावना, हृदययाच्या भावना ही बॉडीलँग्वेज आहे.

एकदा दुबईला जाताना मी विमानाने जात होतो, विमानात जाताना कोणी माझा कस्टमर नसतो म्हणून विमानाने बिझनेस क्लास मधून दुबईला जात होतो. त्या बिझनेस क्लास मध्ये तुमच्या सीट समोर टीव्ही असतात. एक हिंदी सिनेमा त्यावर लागला होता मी तो टाईमपास म्हणून पाहत होतो. शेजारी माझ्या एक फ्रेंच माणूस बसला होता तो माझ्याकडे पाहत इंग्रजीत त्याने मला विचारले 'हा जो सिनेमा आहे त्यातील ही नटी कोण आहे? तुम्ही तिला ओळखता का? मी म्हटले मी हिला ओळखत नाही पण एका नटिला ओळखतो ती म्हणजे माधुरी दीक्षित. ती माझी पार्टनर होती ११ वर्ष ती माझ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर वर होती. आणि तो एकदम उभा राहिला माझा हात हातात घेतला. अहो मी तिला आताच तर भेटण्याचा प्रयत्न करून आलो आहे. पण तिच्या सेक्रटरीने मला भेटूच दिले नाही. मी विचारले ' का असे घडले. तो इंग्रजीत म्हणाला, अहो मी फ्रेंच परफ्युमचा उत्पादक आहे आणि मला ती ब्रांन्डींग साठी हवी आहे. पण तिच्याशी मला कोणी भेटून दिले नाही.
अशा वेळेला तुम्हाला संधी ओळखता यायला पाहिजे व ती साधता यायला पाहिजे. मी त्याला म्हटले मी तिच्याशी तुझी भेट घालून देईन, मला कमिशन नको तुझ्या व्यवसायात भागीदारी दे. अशी संधी जेव्हा येते तेव्हा मोठ्या गोष्टी यातून काय घडतील ते पहा, मोठ्या स्वप्नांकडे पहा. खरेतर हि खूप छोटीशी गोष्ट आहे ओळख करून देणे पण त्यात संधी मी ओळखली. अशा प्रकारे मी आयुष्यात अनेक संधी साधल्या.

आणखी एक गोष्ट सांगतो मी वर्ल्ड इकोनॉमीचा मेंबर आहे, दर तीन महिन्यांनी कुठल्या ना कुठल्या राष्ट्रामध्ये त्या त्या शहरात कॉन्फरन्स भरतात. आपल्या भारतातही अनेकदा या मिटिंग होतात. यावेळी सगळ्या जगातील इंडस्ट्रीयल तिथे येतात, तेव्हा तिथे त्या राष्ट्रातील पंतप्रधान, तेथील नेते सर्वांना त्यांच्या राष्ट्रातील संधी सांगतात व सर्वांना आवाहन करतात गुतंवणूक करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी. जेणेकरून त्यांच्या देशातील रोजगार वाढेल, देशात पैसे येतील.
एकदा आफ्रिकेत डरबन मध्ये ही कॉन्फरन्स होती व तिथे मी गेलो होतो. राउंड टेबल कॉन्फरन्स भरली होती आणि प्रत्येकजण काहीना काही स्पीच देत होते. माझी वेळ आली आणि का कोण जाणे मी काहीबाही बोलून गेलो, मी उठलो आणि म्हणालो इंग्रजीत ' आदरणीय पंतप्रधान मी तुमच्या देशातील गरीब लोकांसाठी दहा हजार घरे फुकट बांधून देईन. सर्वजण अचंबित होऊन माझ्याकडे बघायलाच लागले. क्षणभर कोणीच टाळ्या नाही वाजवल्या, पण हळू हळू लक्षात आल्यानंतर एक एक जण टाळ्या वाजवू लागला. नंतर मला माझी चूक लक्षात आले की, आपण हे काय बोलून बसलो आहे. मला आपल्या मुंबई पुणेची सवय, जर मी दहा हजार झोपड्या फुकट बांधून दिल्या तर मला दहा Tower फुकट बांधायला मिळतात पुण्यात. मला तितका एफ एस आय मिळतो, माझ्यातील बिल्डर जागा झाला.
आता झालीना पंचायत, त्यांनी संध्याकाळी वेगळे बोलवून घेतले. मी त्यांना म्हणालो, कि ही डील डन झाली आहे. मी माझा शब्द खरा करून दाखवणार, मी दहा हजार घर फुकट बांधून देईन. फक्त निट समजून घ्या मी एक भारतीय माणूस आहे, मी काही चुकीचे बोलत नाही आहे. मी जे भारतात करू शकतो ते इथे ही करू शकतो. त्यांनी विचारले काय आहे ही ऑपेरेशनल प्रोसेस. त्यांना मी सांगितले की, जर मी दहा हजार झोपड्या फुकट बांधून दिल्या तर मला दहा Tower फुकट बांधायला मिळतात, मला तितका FSI मिळतो आणि ते विकून मी पैसे मिळवतो. मग त्यांनी सांगितले की ओके मग तुम्ही इथे माझ्या देशात फ़्लट बांधा आणि विका. पण मी म्हटले इकडे तुमच्या देशात फ़्लट बांधले तर ते विकत कोण घेणार. सर तुमचा देश नुकताच स्वतंत्र झाला आहे, तुमचा प्रॉब्लेम जो आहे ते म्हणजे घर, मी ते दहा हजार घर तुम्हाला फुकट बांधून देईन, पण त्या बदल्यात तुम्ही मला काय देणार? मी कधी नाही म्हणालो, असे म्हणत मी आपली चूक दुरुस्त करायला लागलो.

मग त्यांची आपआपसात चर्चा खलबत सुरु झाली, त्यात मधे एक तास गेला. येस आम्ही तुम्हाला काहीतरी द्यायला तयार आहोत. मी विचारले काय? आम्ही तुम्हाला २५ वर्षांच्या कराराने खाण चालवायला देत आहोत, दगडाची नाही मित्रांनो सोन्याची. कुठल्या कुठे गोष्ट गेली … ही ऑफर दुर्देवाने मला पुढे घेता आली नाही कारण त्यावेळी त्या देशात कायदा सुव्यवस्था परिस्थिती खराब होती.
पण यातून मला तुम्हाला काय सांगायचे आहे की तुम्ही हृदयापासून बोला नक्की काही ना काही घडणारच. संधी, प्रोब्लेम, आयुष्य हे असे काहीना काहीतरीच चालूच असणार यातूनच आपल्याला मार्ग काढत पुढे जायचे असते.

आयुष्य आपल्या रानातल्या झऱ्यासारखे आहे. रानातला झरा वाहतो कसा ते पहा, तो नागमोडी वाहतो. आयुष्य सुद्धा हे सरळ असूच शकत नाही, ते नागमोडीच असणार हे स्वीकारा. आयुष्य नागमोडी आहे म्हणूनच ते जीवन छान असते. रानातला झरा वाहतो तेव्हा तो काट्याकुट्यातून वाहत असतो. आपल्याही आयुष्यात काटे हे लागणारच, पुढे दगड धोंडे लागतात. रानातला झरा दगडधोंड्यातून वाहतान ठेचकाळत नाही तर सुंदर आवाज करत वाट काढून पुढे निघून जातो. पुढे मोठा धोंडा असतो पण तिथे तो थांबत नाही, पाणी एका जागी थांबले तर डबके होते. ते पाणी त्या मोठ्या धोंड्यापाशी थांबत नाही, वाट काढून पुढे निघून जाते. कारण त्याचे ध्येय असते पुढे जाऊन समुद्राला मिळायचे. आपल्या आयुष्यात सुद्धा असेच असते, आपल्या वाटेत दगड धोंडे, काटेकुटे असतील पण कुठेच थांबू नका, वाट काढून पुढे निघून जा. हा रानातला झरा त्याचा मार्ग तो स्वतःच शोधून काढतो कुणाची मदत घेत नाही. आपण व्यवसायवाले आहोत, आपला मार्ग आपणच काढायचा असतो. आपले संकटे आपणच दूर करायची आहेत, मुळात संकटाना संकट मानायचे नसते. असे आयुष्य ठेवा बघा यश दोन्ही हात जोडून तुमच्यासमोर येईल आणि यश तुम्हाला नकार देणार नाही.

आता जरा आपण प्रश्न उत्तरे घेऊयात…

प्रश्न - सर भांडवल कसे उभे करावे?
उत्तर - तुमच्याकडे १० ० रु असतील तर १०० रु चा माल भरा. आत बँकेकडे जाणार असाल तर बँकेकडे कसे जावे? १०० रु तुमचे, त्यानंतर तुमच्या आई वडील भाऊ यांच्याकडून ५ ते २५ रु घ्या. आत तुमच्याकडे झाले १२५ रु, मित्राकडे जा एका मित्राकडून २५, तर दुसऱ्या मित्राकडून २५ घ्या, थोडे थोडेच घ्या जास्त त्यांना त्रास देऊ नका.

आता समजा तुम्हाला २५ लाख भांडवल उभे करायचे आहे. तुमच्याकडे १ लाख आहेत. आई वडिलांनी तुम्हाला ५० हजार दिले. मित्रांकडे जा, एकाच मित्राच्या मागे ५ लाख मागत बसू नका. त्याला विचार किती देऊ शकतो? २ लाख देऊ शकतो तर ५० हजारच घ्या. उद्या ते परत देताना ते ५० हजार त्याला जड होत नाही, कारण त्याची २ लाख देण्याची कॅप्यासिटी होती. पुढे मागे देताना त्याला उशीर झाला तरी त्याला तितका त्रास होत नाही. पण समजा ५ लाख देण्याची त्याच्या बँकेत होते आणि तुम्ही ते सर्व घेतलेत, मग उद्या उशीर झाला तर प्रॉब्लेम तुमच्या मित्राचा होतो. मैत्रीमध्ये तो कदाचित म्हणेल अरे सर्व घेऊन जा, मैत्रीमध्ये पैसे महत्वाचे नाहीत. पण तसे करू नका, त्याला सुद्धा सेफ राहू द्या, थोडेच घ्या. एकाच माणसाकडून ५ लाख घेण्या ऐवजी १० मित्रांकडून ५० हजार घ्या.
मग आता समजा तुमचे १ लाख, आई वडिलांकडून घेतलेले ५० हजार व मित्रांकडून उभे केलेले ५ लाख असे एकूण सर्व ६ लाख ५० हजार घेऊन बँकेकडे जा. बँकेला सांगा मी एकूण लोन चे २५ टक्के उभे केले आहेत, वरचे १८ लाख तुम्ही टाका. माझ्याकडे इतके आहेत तुम्ही अजून टाका, बँका देतात. पुढे बँकेशी चांगले संबंध ठेवा, चांगला रेकॉर्ड ठेवा, व्याज वेळवर भरा.

प्रश्न - सर तुमचे हे उद्योजक होण्याच्या स्वप्नाची सुरवात कशी झाली?
उत्तर - मी नशीबवान आहे, शाळा सुटली की १२ वाजता घरी आलो की आता करायचे काय? वडील कामानिमित्त बाहेर गेलेले. आई सकाळीच स्वयंपाक करून एका लहान मुलांच्या शाळेत शिकवायला जायची. शाळेतून आल्यानंतर पुन्हा शिकविण्या घ्यायची, परत घरी आल्यानंतर शिवणकाम करायची असे दिवसभर कष्ट कष्ट कष्ट.

दुपारी १२ नंतर जेवण करून मग करायचे काय तर क्रिकेट खेळायचे. पण क्रिकेट खेळण्यासाठी ४ - ५ कमीत कमी मुल जमविणे आलेच. मग हे माझे मित्र कोण होते तर एकाची चण्यामण्याची गाडी, दुसऱ्याची सुपारीच्या पुड्या बांधण्याचे दुकान, तिसऱ्या मित्राचा टांगा होता, त्याचे वडील टांगा चालवयाचे. आणखी एक मित्र तो एका चहाच्या दुकानात कपबश्या धुवायचा. पाचव्या मित्राची रिक्षा होती व सकाळी पेपरची लाईन होती.

आता हे सर्व मित्र मंडळी जर खेळायला घेऊन जायचे, त्यांना विचारायला गेले कि त्यांचे आई वडील त्यांना म्हणायचे ‘ये शिकून, खेळून कोणाचे भले झाले चल ती गाडी लाव, चल त्या पुड्या बांध’ वेगरे वेगरे. आधी काम करा मग जा तुम्हाला कुठे खेळायला जायचे ते. आता माझे मित्र मला खेळायला हवे असतील तर मी काय करायचो? मी त्यांना मदत करायचो. त्या चण्यामण्याची गाडीवर जा, सुपारीच्या पुड्या बांधून दे, कपबश्या धुवायला मदत कर आणि पेपरची लाईन टाक. आता हे सर्व करायचो तर त्या मित्रांचे वडील मला एक दोन रु द्यायचे. अशा प्रकारे मित्रांच्या संगतीने मला लहानपणीच महिन्याला ३ ते ५ रु सहज कमवता येऊ लागले. अहो आमच्या लहानपणी चार रु म्हणजे खूप होते हो. त्यावेळी दिवाळीत बाबा आम्हाला ५ रु द्यायचे ४ भावंडांना मिळून फटाके आणण्यासाठी, मात्र एका दिवाळीला मीच बाबांना माझ्या जवळ जमलेले माझ्या मेहनतीचे २२ रु दिले. अशा प्रकारे मित्रांना मदत करता करता मी व्यवसाय शिकू लागलो, त्यात आवड घेऊ लागलो. लहानपणापासून मला कष्ट आणि भांडवल हे खऱ्या अर्थाने शिकायला अनुभवयाला मिळाले. मी खरच नशीबवान कि मला हे लहानपणापासून अनुभवता आले, नाहीतर शिकून पदवीधर झालो असतो व वडिलांनी मला, महाराष्ट्र बँकेत अथवा कॉसमॉस बँकेत चिकटवल असतं.

आणखी एक किस्सा म्हणजे मी जेव्हा चन्यामन्या विकायचो त्या वेळी माझ्यासमोर पण एक चन्यामन्या विकायचा. कुठ्ल्यायी धंद्यात स्पर्धा ही असायचीच, आमच्या दोघांच्या गाड्या सारख्याच सजलेल्या असायच्या. पण समोरच्या चन्यामन्या वाल्यापेक्षा माझे चन्यामन्या जास्त विकले जायचे त्याचे रहस्य म्हणजे समोरचा चन्यामन्या कळकट मळकट पायजमा घातलेला असायचा, त्याचे पूर्ण शरीर घामाने भिजलेले असायचे, दाढीचे खुंट वाढलेले … असा तो कळकट मळकट चन्यामन्या वाला आणि त्याच्यासमोर मी हाफ खाकी चड्डी, पांढरा शुभ्र अंगात शर्ट, केस निट विचारलेले असा नीटनेटका चन्यामन्या विकणार … साहजिकच मला

सांगा कोणाचा माल जास्त विकला जाणार. मित्रांनो असे लहानपणापासून अनेक छोटेमोठे व्यवसाय करत मी पैसे कमवायला लागलो, काय काय नाही केले ते विचारा … अशा प्रकारे माझ्या उद्योजक होण्याच्या स्वप्नाला
सुरवात झाली. 

-  डी. एस. कुलकर्णी

 'नवी अर्थक्रांती' फेसबुक  





Wednesday 6 January 2016


दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर 
      आज दि. ६ जानेवारी २०१५ . वृत्तपत्रसृष्टीत ६ जानेवारी या तारखेला विशेष महत्व आहे. कारण आजपासून साधारणपणे १८३ वर्षांपूर्वी ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई मध्ये 'दर्पण' या नावाने पाक्षिकास सुरूवात केली आणि तो मराठी वृत्तपत्रसृष्टीचा सुवर्ण दिन ठरला. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी दर्पण दिन साजरा करतो.
 
      एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा फार मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा १८३२ ते १८४६ या काळात उमटवला.


      बाळशास्त्री जांभेकरांना आपण ‘दर्पण’कार जांभेकर म्हणूनच ओळखतो. ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा समर्थपणे वाहिली. भविष्यकाळातील या माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती. परकी सत्तेला उलथून टाकायचे असेल, तर समाजजागृती घडवायला हवी आणि त्यासाठी लेखणीला पर्याय नाही हे त्यांना फार पूर्वीच समजले होते. बाळशास्त्री कडवे देशाभिमानी होते. त्यांच्या या देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतूनच दर्पणसारख्या नियतकालिकाचा जन्म झाला आणि मराठी वृत्तपत्रविश्र्वात नवी पहाट उगवली. दर्पणाचा जन्म होताना गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचेही सहकार्य बाळशास्त्रींना लाभले. त्या वेळी बाळशास्त्रींचे वय अवघे वीस वर्षांचे होते. एका वृत्तपत्राच्या संपादकाला आवश्यक असणारी भाषेची जाण आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते.


      दर्पणाचा पहिला अंक ६ जानेवारी, १८३२ रोजी प्रकाशित झाला. वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.


      आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते.दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्र्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजीत ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून त्यांनी ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली. यातूनच पुढे ‘स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले.


      १८४० मध्येच त्यांनीदिग्दर्शन’ या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरुवात केली. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन शास्त्र,पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान आदी विषय नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विद्वत्तेला जोड होती ती त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची. संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या त्या काळच्या प्रचलित भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतेच, याशिवाय ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती भाषाही त्यांना उत्तम अवगत होत्या. या भाषांसह विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र व सामान्य ज्ञान या विषयांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. आज मराठीतील वृत्तपत्रांचे जनक असा जसा त्यांचा नावलौकिक आहे, तसाच एल्फिन्स्टन कॉलेजमधील नावाजलेले, हिंदीचे पहिले प्राध्यापक असाही त्यांचा लौकिक आहे. त्याचबरोबर रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले पहिले भारतीय असाही मान त्यांच्याकडे जातो. १८४५ मध्ये त्यांनी केलेले ज्ञानेश्र्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते. बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. तसेच त्यांनी नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा इतिहास, शून्यलब्धिगणित आदी ग्रंथांची निर्मिती केली.

      साधारणपणे १८३० ते १८४६ या काळात बाळशास्त्रींनी आपले योगदान महाराष्ट्राला (व भारताला) दिले. या काळात बहुसंख्येने समाज निरक्षर, अंधश्रद्ध व अज्ञानी होता. म्हणूनच अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात, विविध क्षेत्रांत त्यांनी केलेले प्रचंड कार्य मूलभूत , मौल्यवान व अद्‌भूत ठरते. ६ जानेवारी रोजीदर्पण’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हाच योगायोगाने बाळशास्त्रींचाही जन्मदिवस. त्यांच्या स्मृत्यर्थ हाच दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो.

Wednesday 30 December 2015



भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार :  डॉ. विक्रम साराभाई


विक्रम अंबालाल साराभाई (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

   विक्रम साराभाई यांचा जन्म अमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात ऑगस्ट १२ १९१९ ला झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या आठ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते.
 
   आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.

    डॉ. विक्रम साराभाई
   १९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यांनी ‘कॉस्मिक रे इन्वेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येवून त्यांनी नोव्हेंबर ११, १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. साराभाईं च्या अथक प्रयत्नातूनच १९६९ साली भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोची स्थापना झाली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.

   विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातूनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डॉ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखिल त्यांनी उभारली. डॉ.विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली भारत सरकारचा पद्म भूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हा पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आला.


डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलम सुद्धा साराभाईंना प्रेरणास्रोत मनात असत. अशा या अवकाश संशोधनातील महामेरुचे ३१ डिसेंबर १९७१ साली कोवालम (केरळ) येथे रात्री झोपेतच ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. अवकाश संशोधन क्षेत्रातील या महान संशोधकाचा आज स्मृतिदिन त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.