बिझनेस करताना पुरून पुरून वापरण्याची प्रवृत्ती सोडा. - डी.
एस. कुलकर्णी
माझ्या आईने मला दोन गोष्टी सांगितल्या होत्या की, बाबारे आयुष्यात
कधी दोन कोट वाल्यांच्या नादी लागू नकोस. एक काळा कोटवाला, म्हणजे
वकिलाच्या नादी लागू नका, कोर्टाची पायरी चढू नका आपण
धंदेवाले आहोत. डोक्यावर बर्फ व तोंडात खडीसाखर ठेऊन ‘तू बाबा मोठ्या बापाचा,
जाणा बाबा’ पण ती कोर्टाची पायरी नको. भाकरी फिरवली नाही तर ती
करपते, भाकरी एका जागी कधी ठेवायची नाही. तर दुसरा कोटवाला
म्हणजे डॉक्टर, तुमची तब्येत खणखणीत ठेवा, लक्षात घ्या तुम्ही बिझनेस मध्ये आहात. उद्योग बिझनेस मध्ये असलेल्या
लोकांनो, अरे आपल्याला आजारी पडायला परवानगी नाही रे.
डॉक्टरच्या नादी कधी लागू नका याचा अर्थ तब्येत खणखणीत ठेवा.
बिझनेस करताना पुरून पुरून वापरण्याची प्रवृत्ती सोडा. अंथरून पाहून पाय
पसराही ज्या कोणी मराठी माणसाने म्हण तयार केली त्याला आपण माफ् करूया, कशाला त्याच्या
नादी लागायचे. अरे व्हा ना मोठे, तुम्हाला कोणी सांगितले
तुम्हाला अंथरून पांघरून मिळणार नाही म्हणून.
बाबारे मरताना डोक्यावर ५ रु सुद्धा कर्ज नको, ही दुसरी दळीद्री
म्हण कोणी निर्माण केली माहित नाही. कर्ज नाही काढलं तर धंधा चालणार कुठनं. आज
मुठभर जोंधळे पेरले तर पोतेभर धान्य येत. पोतेभर जोंधळे पेरले तर किती धान्य येईल
हा साधा नियम आहे. आता मला सांगा स्वतःच्या घरातील जोंधळे आणून आणून तुम्ही किती
आणणार, तो एक नियम आहे.
आज मी व्याख्यान द्यायला आलो आहे. आज मी इथे दमून आलो नाही, तर चिडून आलो आहे,
मी आज खूप चिडलो आहे. मी स्वतः रोज माझ्या बायकोला सांगतो की जर
माझे आडनाव कुलकर्णी नसतं आणि मी साला मराठी नसतो तर मी आज अंबानीला मागे टाकलं
असतं. आपल्यातील जे मराठीपण आहे ना, मीच किती वेळा बोलतो पण
मला सुद्धा अजून पूर्णपणे ओवरटेक करता येत नाही. मी पूर्णपणे मराठी नाही, अर्धा मारवाडी, अर्धा गुजराती व मग उरलासुरला मराठी
ब्राम्हण आहे.
मी मारवाडी लोकांचा खूप मोठा भक्त आहे. हिशोबाला ते अगदी पक्के
असतात. तोंडात नेहमी खडीसाखर असते. डोक्यावर त्यांच्या नेहमी बर्फ असतो. हे लोक
नेहमी फ़्लेझीबल असतात, ताईसाहेब, काकासाहेब
असे मधुर बोलतात. या उलट मराठी माणूस ताठ असतो व म्हणतो काय चुकले माझे बोला.
स्वतःच्या लढाया स्वतःच लढायच्या असतात, दुसऱ्यांच्या लढायांचे वर्णन ऐकताना
त्याचे काय चुकले तो का पराभूत झाला, तो विजयी कसा झाला हे
शोधण्यापेक्षा तो पराभूत झाला तर का पराभूत झाला, त्याच्या
चुका कोणत्या हे शोधा आणि त्यातनं त्या इतिहासातून आपण आपल्या लढाया लढायच्या
असतात.
आज आपण भारतासारख्या देशात आहोत, एका बाजूने आतिशय भ्रष्ट आचरणाने देश
रसातळाला चालला आहे असे असताना त्याच वेळेला आपल्याकडे दुसरी ताकद म्हणजे जगातील
सर्वात तरुण लोकसंख्या ही जगात कोठेही नाही ती भारतात आहे. जगातले सर्वात जास्त
तरुण आज भारतात आहेत. जगात सर्वाधिक इंग्रजी बोलणारे आपल्या देशात आहेत ह्या काही
आपल्या भक्कम बाजू आहेत, त्यामुळे बिझनेस करणाऱ्याला काही
मरण नाही.
बिझनेस मध्ये तुम्हाला तुमचा कस्टमर ओळखता आला पाहिजे, तुम्हाला तुमचे
आयुष्य ओळखता यायला पाहिजे आणि त्याला अनुसरून बिझनेस करता यायला पाहिजे. नेहमी
आपल्या कस्टमरचा अभ्यास करा. मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा
कोणताही बिझनेस असू द्या जर तुमचे ऑफिस असेल तर ते नेहमी स्वच्छ क्लीन नीट नेटके
ठेवा यावर सुद्धा तुमच्या बिझनेसचे यश अवलंबून असत.
धंद्यामध्ये मार्केटिंग खूप महत्वाचे. धंद्यामधे विकणारा सर्वात महत्वाचा
भाग असतो. जर तुम्हाला व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर तर काहीना काही तरी
विकायची पहिल्यापासून सवय ठेवा. विनोदाचा भाग सोडून द्या, पण तुम्हाला टकलू
माणसाला सुद्धा कंगवा विकता आला पाहिजे. काहीना काही विकण्याचा आत्मविश्वास
निर्माण करा मग तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता.
व्यवसायात प्रेझेंटेशन सुद्धा खूप महत्वाचे. सुरवातीच्या काळात मला
किर्लोसकरांनी १०० रु दिले होते, चांगले कपडे, बूट व टाय घेण्यासाठी.
तेव्हापासून मित्रांनो ही टाय जी माझ्या गळाल्या लागली आहे ती अजूनही आहे. मी
नेहमी कुठेही जाताना व्यवस्तिथ नीटनेटके कपडे घालून जातो. तुमचा पेहरावा असा असला
पाहिजे की तुम्ही समोरच्याला आपलेसे वाटले पाहिजे. तुमचे व्यक्तिमत्व इतके स्वच्छ
पाहिजे की तुमच्या वागण्या बोलण्यातून लोकांना तुमच्याबद्दल विश्वास निर्माण झाला
पाहिजे.
मित्रांनो विहिरीत, ओढ्यात, स्विमिंग पूल / डबक्यात किती दिवस पोहायचे? नदीकडे
आपण जायला हवे व पुढे समुद्राचे ध्येय ठेवले पाहिजे. रोज तुम्हाला बिझनेसला पैसे
कमी पडत असतील तर समजा तुम्ही प्रगती करत आहात, आणि जर तुमचे
पैसे उरत असतील लक्षात ठेवा तुम्ही धोक्याच्या दिशेने जात आहात. दरवर्षी तुमचा १०
टक्केने बिझनेस वाढलाच पाहिजे, तुमची ग्रोथ झालीच पाहिजे. एक
गोष्ट लक्षात घ्या असाही तसाही तुमचा दरवर्षी बेसिक Infrastructure कॉस्ट वाढणारच आहे मग तुमचा ग्रोथ रेट वाढलाच पाहिजे, आणि यासाठी तुम्हाला कर्ज घेतलेच पाहिजे. तुम्हाला तुमच्या कर्जाचा अभिमान
वाटला पाहिजे. मला आज अभिमान आहे की माझ्यावर ७०० कोटींचे कर्ज आहे. या कर्ज
देणाऱ्या एकूण १४ बँका आहेत व त्यातील २ अमेरिकन बँक आहेत.
आता ही पत कशी वाढवायची? जर समजा तुमचा एक व्यवसाय आहे व त्यातून तुम्हाला १०० रु
मिळाले तर ते सर्व नेउन प्रथम बँकेत भरायचे. आता तुम्हाला तुमच्या व्यवसायचा माल
आणण्यासाठी २० रु लागत आहेत, तर ते आता तुमच्या बँकेतील १००
रु मधून २० रु काढा. जेवढे तुमचे बँकेत पैसा जातो तेवढा तो तुमचा टर्नओवर मानला
जातो. तुम्ही किती पैसा काढता यापेक्षा किती भरता याला महत्व आहे.
मित्रांनो पेला अर्धा भरला आहे की पूर्ण, हे पाहत बसू नका. तर जे काही आहे,
ते देवाने तुम्हाला खूप काही दिले आहे असा विचार करून आयुष्य पुढे
न्या. काय गेले आहे त्यापेक्षा काय आले आहे याकडे पहा. माझी ज्यावेळी पेपरची लाईन
होती त्यावेळी म्याट्रीकचा निकाल पेपर मधून यायचा. दुपारी जीवाच्या आकांताने ते
पेपर आपल्या हातात घ्यायचे व सायकलवर टाकून ‘आला आहे एस.एस. सी. रिझल्ट’ अशी आरोळी
मारत ते पेपर विकायचे. १० मिनिटांमध्ये लोक जास्त पैसे देऊन विकत घ्यायचे व व ते
पेपर पटकन संपायचे. सगळे अंक १० मिनिटांमध्ये संपून माझ्याकडे एक मोठी चिल्लर जमा
व्हायची. ४० रु डाव्या खिशात व ४० रु उजव्या खिशात टाकून मी रुबाबात चालायाचो. ते
८० रु चे जे सुख आहे ते आज ४००० कोटी रु यात मला मिळत नाही. सुख नेमके कशात
मानायचे ते मित्रांनो लक्षात घ्या. तुम्हाला समाधान कशात मानायचे हे कळले ना मग
पुढे कुठेही त्रास होत नाही.
मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांकडे एक मोठी गोष्ट आहे, एक मोठी ताकद आहे
ती म्हणजे विश्वासहर्ता. मराठी माणसाचा विश्वासहर्ता हा मोठा गुण आहे, हाच मोठा आपला ब्रन्ड आहे. लोक इतर काहीही म्हणतील की त्याला धंधा करायला
येत नाही, त्याच्याकडे व्यवसायाची समज कमी आहे. हा पण तो
मराठी माणूस आहे व तो चोर नाही. अरे हा मराठी माणूस आहे याच्याकडून वस्तू विकत
घ्यायला हवी कारण हा कधी फसवणार नाही. मग तुमच्याकडे जर हा इतका मोठा प्लस पॉईन्ट
आहे तर तो इनक्याश करा. इथे जरूर गर्वाने बोल की आम्ही मराठी आहोत.
सुरवातीला अनेक छोटे छोटे व्यवसाय करताना मला या अनेक गोष्टी शिकायला
मिळाल्या. लहानपणी भाजी विकताना ग्राहक जेव्हा भाजी घ्यायला यायचे तेव्हा माझ्या
काकांना सांगायचे की त्या लहान मुलाच्या (म्हणजे माझ्या) हातात तराजू द्या, कारण तो कधीही
काटा मारत नाही. तुमच्या तराजूचा काटा हा नेहमी ग्राहकाच्या बाजूनेच झुकलेला
असायला हवा.
मी आलेली संधी कधीच सोडत नाही, असे करताना चुका होतात. पण मी त्या
दुरुस्त करतो व त्यातून मार्ग काढतो. त्यावेळी पुण्यात जंगली महाराज रोडवर बांधकाम
करताना अनेक नियमांमुळे बहुतेक सर्व बांधकाम अनधिकृत होत होते. मग ते महापालिका येउन
पडायचे. मग मी जिद्दीने ठरवले की आपण सर्व नियमांत बसवून हॉटेल बांधायचे. मी
प्रयत्न केले व सर्व अधिकृत परवानग्या घेऊन बांधकाम केले. त्यात माझे खूप नुकसान
झाले, माझी खूप जागा वाया गेली. पण मी म्हटले हरायचे नाही,
जिद्द नाही सोडायची. हॉटेल बांधून तयार झाले पण वर्षभर जास्त कस्टमर
आलेच नाही. मग मला कमी किमतीत जागा विकण्याचे ऑफर येऊ लागले, काहींनी तर मला वेड्यात काढले. कारण त्यांना लक्षात आले की याच्याकडे
कोणीच येत नाही.
मग मी विचार करू लागलो काय करायचे? मग मी स्वतःच रेस्टोरंन्ट चालू
करायचे ठरवले. म्हटले डोसा इडली नाही तर मोठे स्वप्न पाहायचे. मग मी सरळ अमेरिके McDonald
मध्ये संपर्क केला. त्यांचे अनेक वेळेला नकार आला पण मी सोडलेच नाही
शेवटपर्यंत. त्यावेळी मला कोणी तरी तरी सुचवले की तू कार शो रूम चा का विचार करत
नाहीस. ज्याने सुचवले त्याचे स्वतःचे कार शो रूम मी पहिले आणि माझे डोळे चकाकले.
तिथून उठलो व थेट टोयाटोचे पुण्यातील हेड ऑफिस गाठले आणि टोयाटोची डीलरशीप घेऊन
आलो. साहेब वडापाव आणायला गेलो आणि टोयाटो घेऊन आलो. McDonald म्हणजे दोन पावाच्या आत वडा असतो, म्हणजे तो काय
वेगळा असतो का? तो वडापावच हो. अशाप्रकारे संधी कुठे लपलेली
ते असते सांगता येत नाही.
तुमच्या कस्टमरला तुमचे ऑफिस त्याचे वाटायला हवे. तुमच्या कस्टमरला तुमच्या
टेबलावर येउन हात आपटून भांडण्याची मुभा असायला हवी, असे खरच करून बघा तुम्ही आयुष्यात
नेहमी यशस्वी आणि यशस्वीच होत जाल. माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा कोणी फोन करतात तेव्हा
त्याला गाणे सुद्धा आनंद देणारे असेल याची देखील आम्ही काळजी घेतो. इतक्या बारीक
बारीक गोष्टी पहा, तुमच्या कस्टमरला जिंका.
दुसरे मित्रांनो भाषेवाचून काही अडत नाही हे लक्षात घ्या. माझे स्वतःचे
इंग्रजी मुळे काहीच अडले नाही. बिझनेस मद्धे जेव्हा तुम्ही पडता तेव्हा भाषेमुळे
काहीच अडत नाही. मी खूप देशात फिरतो चीन, जपान, फ्रान्स
यासारख्या देशात, तेथील लोकांशी बोलतो भेटतो माझे कशामुळे
काहीच अडले नाही. जेव्हा जेव्हा अडचणी येतात ना तेव्हा तेव्हाच मुळात आपल्याला
मार्ग सुचतात. तुमच्यात आत्मविश्वास पाहिजे भिडून जाण्याची तयारी पाहिजे.
हृदयापासून बोला तीच आपली मातृभाषा असते, त्यावेळी तुमचे
डोळे बोलतात, हृदयापासून जे येते तेच कनेक्ट होते. तरुणांनो
मला सांगा प्रथम पोरगी पटवताना तुम्ही डोळे मारूनच तुमच्या भावना तिला सांगता ना?
तिथे सुद्धा जे हृदयातून येते तेच कनेक्ट होते. डोळ्याच्या भावना,
प्रेमाच्या भावना, हृदययाच्या भावना ही
बॉडीलँग्वेज आहे.
एकदा दुबईला जाताना मी विमानाने जात होतो, विमानात जाताना कोणी माझा कस्टमर
नसतो म्हणून विमानाने बिझनेस क्लास मधून दुबईला जात होतो. त्या बिझनेस क्लास मध्ये
तुमच्या सीट समोर टीव्ही असतात. एक हिंदी सिनेमा त्यावर लागला होता मी तो टाईमपास
म्हणून पाहत होतो. शेजारी माझ्या एक फ्रेंच माणूस बसला होता तो माझ्याकडे पाहत
इंग्रजीत त्याने मला विचारले 'हा जो सिनेमा आहे त्यातील ही
नटी कोण आहे? तुम्ही तिला ओळखता का? मी
म्हटले मी हिला ओळखत नाही पण एका नटिला ओळखतो ती म्हणजे माधुरी दीक्षित. ती माझी
पार्टनर होती ११ वर्ष ती माझ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर वर होती. आणि तो एकदम उभा
राहिला माझा हात हातात घेतला. अहो मी तिला आताच तर भेटण्याचा प्रयत्न करून आलो
आहे. पण तिच्या सेक्रटरीने मला भेटूच दिले नाही. मी विचारले ' का असे घडले. तो इंग्रजीत म्हणाला, अहो मी फ्रेंच
परफ्युमचा उत्पादक आहे आणि मला ती ब्रांन्डींग साठी हवी आहे. पण तिच्याशी मला कोणी
भेटून दिले नाही.
अशा वेळेला तुम्हाला संधी ओळखता यायला पाहिजे व ती साधता यायला पाहिजे. मी
त्याला म्हटले मी तिच्याशी तुझी भेट घालून देईन, मला कमिशन नको तुझ्या व्यवसायात
भागीदारी दे. अशी संधी जेव्हा येते तेव्हा मोठ्या गोष्टी यातून काय घडतील ते पहा,
मोठ्या स्वप्नांकडे पहा. खरेतर हि खूप छोटीशी गोष्ट आहे ओळख करून
देणे पण त्यात संधी मी ओळखली. अशा प्रकारे मी आयुष्यात अनेक संधी साधल्या.
आणखी एक गोष्ट सांगतो मी वर्ल्ड इकोनॉमीचा मेंबर आहे, दर तीन महिन्यांनी
कुठल्या ना कुठल्या राष्ट्रामध्ये त्या त्या शहरात कॉन्फरन्स भरतात. आपल्या
भारतातही अनेकदा या मिटिंग होतात. यावेळी सगळ्या जगातील इंडस्ट्रीयल तिथे येतात,
तेव्हा तिथे त्या राष्ट्रातील पंतप्रधान, तेथील
नेते सर्वांना त्यांच्या राष्ट्रातील संधी सांगतात व सर्वांना आवाहन करतात
गुतंवणूक करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी. जेणेकरून
त्यांच्या देशातील रोजगार वाढेल, देशात पैसे येतील.
एकदा आफ्रिकेत डरबन मध्ये ही कॉन्फरन्स होती व तिथे मी गेलो होतो. राउंड
टेबल कॉन्फरन्स भरली होती आणि प्रत्येकजण काहीना काही स्पीच देत होते. माझी वेळ
आली आणि का कोण जाणे मी काहीबाही बोलून गेलो, मी उठलो आणि म्हणालो इंग्रजीत '
आदरणीय पंतप्रधान मी तुमच्या देशातील गरीब लोकांसाठी दहा हजार घरे
फुकट बांधून देईन. सर्वजण अचंबित होऊन माझ्याकडे बघायलाच लागले. क्षणभर कोणीच
टाळ्या नाही वाजवल्या, पण हळू हळू लक्षात आल्यानंतर एक एक जण
टाळ्या वाजवू लागला. नंतर मला माझी चूक लक्षात आले की, आपण
हे काय बोलून बसलो आहे. मला आपल्या मुंबई पुणेची सवय, जर मी
दहा हजार झोपड्या फुकट बांधून दिल्या तर मला दहा Tower फुकट
बांधायला मिळतात पुण्यात. मला तितका एफ एस आय मिळतो, माझ्यातील
बिल्डर जागा झाला.
आता झालीना पंचायत, त्यांनी संध्याकाळी वेगळे बोलवून घेतले. मी त्यांना म्हणालो, कि ही डील डन झाली आहे. मी माझा शब्द खरा करून दाखवणार, मी दहा हजार घर फुकट बांधून देईन. फक्त निट समजून घ्या मी एक भारतीय माणूस
आहे, मी काही चुकीचे बोलत नाही आहे. मी जे भारतात करू शकतो
ते इथे ही करू शकतो. त्यांनी विचारले काय आहे ही ऑपेरेशनल प्रोसेस. त्यांना मी
सांगितले की, जर मी दहा हजार झोपड्या फुकट बांधून दिल्या तर
मला दहा Tower फुकट बांधायला मिळतात, मला
तितका FSI मिळतो आणि ते विकून मी पैसे मिळवतो. मग त्यांनी
सांगितले की ओके मग तुम्ही इथे माझ्या देशात फ़्लट बांधा आणि विका. पण मी म्हटले
इकडे तुमच्या देशात फ़्लट बांधले तर ते विकत कोण घेणार. सर तुमचा देश नुकताच
स्वतंत्र झाला आहे, तुमचा प्रॉब्लेम जो आहे ते म्हणजे घर,
मी ते दहा हजार घर तुम्हाला फुकट बांधून देईन, पण त्या बदल्यात तुम्ही मला काय देणार? मी कधी नाही
म्हणालो, असे म्हणत मी आपली चूक दुरुस्त करायला लागलो.
मग त्यांची आपआपसात चर्चा खलबत सुरु झाली, त्यात मधे एक तास गेला. येस आम्ही
तुम्हाला काहीतरी द्यायला तयार आहोत. मी विचारले काय? आम्ही
तुम्हाला २५ वर्षांच्या कराराने खाण चालवायला देत आहोत, दगडाची
नाही मित्रांनो सोन्याची. कुठल्या कुठे गोष्ट गेली … ही ऑफर दुर्देवाने मला पुढे
घेता आली नाही कारण त्यावेळी त्या देशात कायदा सुव्यवस्था परिस्थिती खराब होती.
पण यातून मला तुम्हाला काय सांगायचे आहे की तुम्ही हृदयापासून बोला नक्की
काही ना काही घडणारच. संधी, प्रोब्लेम, आयुष्य हे असे काहीना काहीतरीच चालूच
असणार यातूनच आपल्याला मार्ग काढत पुढे जायचे असते.
आयुष्य आपल्या रानातल्या झऱ्यासारखे आहे. रानातला झरा वाहतो कसा ते पहा, तो नागमोडी वाहतो.
आयुष्य सुद्धा हे सरळ असूच शकत नाही, ते नागमोडीच असणार हे
स्वीकारा. आयुष्य नागमोडी आहे म्हणूनच ते जीवन छान असते. रानातला झरा वाहतो तेव्हा
तो काट्याकुट्यातून वाहत असतो. आपल्याही आयुष्यात काटे हे लागणारच, पुढे दगड धोंडे लागतात. रानातला झरा दगडधोंड्यातून वाहतान ठेचकाळत नाही तर
सुंदर आवाज करत वाट काढून पुढे निघून जातो. पुढे मोठा धोंडा असतो पण तिथे तो थांबत
नाही, पाणी एका जागी थांबले तर डबके होते. ते पाणी त्या
मोठ्या धोंड्यापाशी थांबत नाही, वाट काढून पुढे निघून जाते.
कारण त्याचे ध्येय असते पुढे जाऊन समुद्राला मिळायचे. आपल्या आयुष्यात सुद्धा असेच
असते, आपल्या वाटेत दगड धोंडे, काटेकुटे
असतील पण कुठेच थांबू नका, वाट काढून पुढे निघून जा. हा
रानातला झरा त्याचा मार्ग तो स्वतःच शोधून काढतो कुणाची मदत घेत नाही. आपण
व्यवसायवाले आहोत, आपला मार्ग आपणच काढायचा असतो. आपले संकटे
आपणच दूर करायची आहेत, मुळात संकटाना संकट मानायचे नसते. असे
आयुष्य ठेवा बघा यश दोन्ही हात जोडून तुमच्यासमोर येईल आणि यश तुम्हाला नकार देणार
नाही.
आता जरा आपण प्रश्न उत्तरे घेऊयात…
प्रश्न - सर भांडवल कसे उभे करावे?
उत्तर - तुमच्याकडे १० ० रु असतील तर १०० रु चा माल भरा. आत बँकेकडे जाणार
असाल तर बँकेकडे कसे जावे? १०० रु तुमचे, त्यानंतर तुमच्या आई वडील भाऊ
यांच्याकडून ५ ते २५ रु घ्या. आत तुमच्याकडे झाले १२५ रु, मित्राकडे
जा एका मित्राकडून २५, तर दुसऱ्या मित्राकडून २५ घ्या,
थोडे थोडेच घ्या जास्त त्यांना त्रास देऊ नका.
आता समजा तुम्हाला २५ लाख भांडवल उभे करायचे आहे. तुमच्याकडे १ लाख आहेत.
आई वडिलांनी तुम्हाला ५० हजार दिले. मित्रांकडे जा, एकाच मित्राच्या मागे ५ लाख मागत बसू
नका. त्याला विचार किती देऊ शकतो? २ लाख देऊ शकतो तर ५०
हजारच घ्या. उद्या ते परत देताना ते ५० हजार त्याला जड होत नाही, कारण त्याची २ लाख देण्याची कॅप्यासिटी होती. पुढे मागे देताना त्याला
उशीर झाला तरी त्याला तितका त्रास होत नाही. पण समजा ५ लाख देण्याची त्याच्या
बँकेत होते आणि तुम्ही ते सर्व घेतलेत, मग उद्या उशीर झाला
तर प्रॉब्लेम तुमच्या मित्राचा होतो. मैत्रीमध्ये तो कदाचित म्हणेल अरे सर्व घेऊन
जा, मैत्रीमध्ये पैसे महत्वाचे नाहीत. पण तसे करू नका,
त्याला सुद्धा सेफ राहू द्या, थोडेच घ्या.
एकाच माणसाकडून ५ लाख घेण्या ऐवजी १० मित्रांकडून ५० हजार घ्या.
मग आता समजा तुमचे १ लाख, आई वडिलांकडून घेतलेले ५० हजार व मित्रांकडून उभे केलेले ५
लाख असे एकूण सर्व ६ लाख ५० हजार घेऊन बँकेकडे जा. बँकेला सांगा मी एकूण लोन चे २५
टक्के उभे केले आहेत, वरचे १८ लाख तुम्ही टाका. माझ्याकडे
इतके आहेत तुम्ही अजून टाका, बँका देतात. पुढे बँकेशी चांगले
संबंध ठेवा, चांगला रेकॉर्ड ठेवा, व्याज
वेळवर भरा.
प्रश्न - सर तुमचे हे उद्योजक होण्याच्या स्वप्नाची सुरवात कशी झाली?
उत्तर - मी नशीबवान आहे, शाळा सुटली की १२ वाजता घरी आलो की आता करायचे काय?
वडील कामानिमित्त बाहेर गेलेले. आई सकाळीच स्वयंपाक करून एका लहान
मुलांच्या शाळेत शिकवायला जायची. शाळेतून आल्यानंतर पुन्हा शिकविण्या घ्यायची,
परत घरी आल्यानंतर शिवणकाम करायची असे दिवसभर कष्ट कष्ट कष्ट.
दुपारी १२ नंतर जेवण करून मग करायचे काय तर क्रिकेट खेळायचे. पण क्रिकेट
खेळण्यासाठी ४ - ५ कमीत कमी मुल जमविणे आलेच. मग हे माझे मित्र कोण होते तर एकाची
चण्यामण्याची गाडी, दुसऱ्याची सुपारीच्या पुड्या बांधण्याचे दुकान, तिसऱ्या
मित्राचा टांगा होता, त्याचे वडील टांगा चालवयाचे. आणखी एक
मित्र तो एका चहाच्या दुकानात कपबश्या धुवायचा. पाचव्या मित्राची रिक्षा होती व
सकाळी पेपरची लाईन होती.
आता हे सर्व मित्र मंडळी जर खेळायला घेऊन जायचे, त्यांना विचारायला
गेले कि त्यांचे आई वडील त्यांना म्हणायचे ‘ये शिकून, खेळून
कोणाचे भले झाले चल ती गाडी लाव, चल त्या पुड्या बांध’ वेगरे
वेगरे. आधी काम करा मग जा तुम्हाला कुठे खेळायला जायचे ते. आता माझे मित्र मला
खेळायला हवे असतील तर मी काय करायचो? मी त्यांना मदत करायचो.
त्या चण्यामण्याची गाडीवर जा, सुपारीच्या पुड्या बांधून दे,
कपबश्या धुवायला मदत कर आणि पेपरची लाईन टाक. आता हे सर्व करायचो तर
त्या मित्रांचे वडील मला एक दोन रु द्यायचे. अशा प्रकारे मित्रांच्या संगतीने मला
लहानपणीच महिन्याला ३ ते ५ रु सहज कमवता येऊ लागले. अहो आमच्या लहानपणी चार रु
म्हणजे खूप होते हो. त्यावेळी दिवाळीत बाबा आम्हाला ५ रु द्यायचे ४ भावंडांना
मिळून फटाके आणण्यासाठी, मात्र एका दिवाळीला मीच बाबांना
माझ्या जवळ जमलेले माझ्या मेहनतीचे २२ रु दिले. अशा प्रकारे मित्रांना मदत करता
करता मी व्यवसाय शिकू लागलो, त्यात आवड घेऊ लागलो.
लहानपणापासून मला कष्ट आणि भांडवल हे खऱ्या अर्थाने शिकायला अनुभवयाला मिळाले. मी
खरच नशीबवान कि मला हे लहानपणापासून अनुभवता आले, नाहीतर
शिकून पदवीधर झालो असतो व वडिलांनी मला, महाराष्ट्र बँकेत
अथवा कॉसमॉस बँकेत चिकटवल असतं.
आणखी एक किस्सा म्हणजे मी जेव्हा चन्यामन्या विकायचो त्या वेळी
माझ्यासमोर पण एक चन्यामन्या विकायचा. कुठ्ल्यायी धंद्यात स्पर्धा ही असायचीच,
आमच्या दोघांच्या गाड्या सारख्याच सजलेल्या असायच्या. पण समोरच्या
चन्यामन्या वाल्यापेक्षा माझे चन्यामन्या जास्त विकले जायचे त्याचे रहस्य म्हणजे
समोरचा चन्यामन्या कळकट मळकट पायजमा घातलेला असायचा, त्याचे
पूर्ण शरीर घामाने भिजलेले असायचे, दाढीचे खुंट वाढलेले …
असा तो कळकट मळकट चन्यामन्या वाला आणि त्याच्यासमोर मी हाफ खाकी चड्डी, पांढरा शुभ्र अंगात शर्ट, केस निट विचारलेले असा
नीटनेटका चन्यामन्या विकणार … साहजिकच मला
सांगा कोणाचा माल जास्त विकला जाणार. मित्रांनो असे लहानपणापासून अनेक
छोटेमोठे व्यवसाय करत मी पैसे कमवायला लागलो, काय काय नाही केले ते विचारा … अशा
प्रकारे माझ्या उद्योजक होण्याच्या स्वप्नाला
सुरवात झाली.
- डी. एस. कुलकर्णी
'नवी अर्थक्रांती' फेसबुक