आधुनिक भारताचे संत : बाबा आमटे
आधुनिक भारताचे संत : बाबा आमटे
मुरलीधर
देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट
येथील ब्राह्मण जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६, इ.स. १९१४ रोजी झाला. वरोड्यापासून
पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे
त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट
परीक्षणे लिहिण्याची आवड होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले.
त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल्एल.बी.
ह्या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी असे बाबांचे
विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ
वकिलीही केली. इ.स. १९४९-५० या कालावधीत त्यांनी कुष्ठरोगनिदानावरील अभ्यासक्रम
पूर्ण केला.
गांधीजींच्या
सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी
स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्ची
घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही
राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली
प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर
राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी
पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व
प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी
इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण
करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नर्मदा बचाव
आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ
दिले होते.
तत्कालीन
समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई. यामुळे कुष्ठरोग्यांस
वाळीत टाकले जाई. आमट्यांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी पाहिला. ते
त्याला घरी घेऊन आले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली. इ.स.
१९५२ साली वरोड्याजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. इ.स. २००८
सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.
![]() |
बाबा आमटे |
सहा
कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, १ आजारी गाय व सरकारकडून मिळालेली ५०
एकर नापीक जमीन यावर त्यांनी कार्य सुरू केले. बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते,
तर एक उच्च दर्जाचे प्रतिभावान साहित्यिक म्हणून समाजासमोर आले
असते. सतत कामात असूनही त्यांनी ‘ज्वाला आणि फुले’ आणि ‘उज्ज्वल
उद्यासाठी’ हे काव्यसंग्रह लिहिले. यांतून त्यांच्या साहित्यिक गुणांसह
समाजकार्यावरची निष्ठाही दिसून येते.
संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता,
धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक
तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य
करण्याची निश्चयी वृत्ती, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी
आपले सर्व प्रकल्प यशस्वी केले. बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली आमटे परिवार
कार्यरत होताच, पण त्यांच्या कार्यामुळे अनेक क्षेत्रांतील
सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली.
फेब्रुवारी
९, इ.स. २००८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे निधन
झाले. आज बाबांच्या पुढच्या पिढ्याही (डॉ.प्रकाश आमटे, विकास
आमटे व त्यांचे कुटुंबीय) विविध प्रकल्पांच्या माध्यमातून तेवढ्याच निष्ठेने व सातत्याने
काम करीत आहेत.
महान व्यक्तिमत्त्व. असा व्यक्ती भारतात जन्माला येणे हे आपले भाग्य. बाबांनी आणि एकूणच आमटे परिवार करीत असलेले कार्य अद्वितीय असेच आहे. बाबांना त्रिवार वंदन.
ReplyDelete